आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकून भाजपला पराभूत केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे काँग्रेस गोटात प्रचंड उत्साह संचारला आहे. यावरच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत कर्नाटकातील जनतेचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले राहुल गांधी?
कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही कर्नाटकच्या जनतेला 5 आश्वासने दिली होती, ही आश्वासने पहिल्याच मंत्रिमंडळात पहिल्याच दिवशी पूर्ण करू. माजी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, कर्नाटकातील गरीब जनतेने काही उद्योगपतींचा पराभव केला आहे. या लढ्यात आम्ही द्वेषाचा वापर केला नाही. मी कर्नाटकातील आमच्या कार्यकर्त्यांचे, आमच्या नेत्यांचे अभिनंदन करतो. काँग्रेस पक्ष कर्नाटकातील गरिबांच्या पाठीशी उभा राहिला. ही लढाई आम्ही प्रेमाने लढलो. या देशावर प्रेम आहे हे कर्नाटकने दाखवून दिले आहे. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, 'कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला भांडवलदारांची सत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला गरीबांची सत्ता होती. या निवडणुकीत काँग्रेस गरिबांच्या पाठीशी उभी होती. आम्ही द्वेष आणि चुकीच्या शब्दांनी लढलो नाही, आम्ही प्रेमाने उघड्या मनाने लढलो. त्यांच्या मते, कर्नाटकातील जनतेने या देशावर प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आणि प्रेमाची दुकाने उघडली. असे राहुल गांधी मत व्यक्त केले.