शिंदे फडणवीस सरकारने नवी जीआर काढला आहे. त्यानुसार आज पासून सरकारी कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे. यापूर्वी देखील या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात मोठे घमासान पाहायला मिळाले होते. शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयावर तेव्हा देखील विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. आता पुन्हा एकदा शिंदे सरकारने नवा जीआर काढल्याने सरकार विरोधकांच्या रडारवर आलं आहे. त्यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दोन पर्याय सुचवले आहे.
आज टिळक भवन येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नाना पटोले बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, वंदे मातरमला आमचा विरोध नाही. पण आपला देश कृषीप्रधान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या अन्नादात्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेने ‘जय बळीराजा’ व ‘रामराम’ म्हणावे अशी आमची भूमिका आहे, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले आहे.
भाजपाचे नेते बिथरले
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरले आहेत. भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून पदयात्रेवर टीका केली जात आहे, लोकशाही, संविधान अबाधित ठेवणे व भारताची एकात्मता व विविधता कायम राखण्यासाठी निघालेल्या या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. असे नाना पटोले बोलताना म्हणाले.