कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनील केदार यांनी 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यावरच आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
कोराडी-तिडंगीदरम्यान ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अतिउच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम महापारेषणच्या वतीने सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे ६ ऑक्टोबर २०१६ रोजी दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले होते. सोबत येथील कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा एक अधिकारीही होता. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार सहकाऱ्यांसह ठिकाणी पोहोचले.
महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता.