राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना, अनेक विषयावरून राजकारण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. मोदी सरकार देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरतंय असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
काय म्हणाले चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा देशाचे विभाजन करण्याचा डाव आहे. केंद्र सरकारकडून देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरले जात आहे. आम्ही विरोधी पक्षात मग मोदीचे कौतुक का करायचे? मी टीका करत राहीन असे ते म्हणाले.
पुढे बोलताना चव्हाण यांनी शिंदे- फडणवीस यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत, सोबत अयोध्येला पण जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, राज्याचा दौरा केला पाहिजे. राज्यातील जनेतची दु:ख समजून घेतली पाहिजेत. राज्यात ओला दुष्काळ आहे, मदत केली पाहिजे. राज्यात जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरत असतील तर चांगली गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यावर दौऱ्यावर दिली आहे.