नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळूनही काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. यावरूनच काल राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यातच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. यावरूनच सकाळी शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिमटा काढला. त्यावरच आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आज भंडारा येथे बोलत असताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत दिल्लीला राहतात त्यांना फार गोष्टी माहिती नसतात. राऊत जे बोलले, ते कदाचित अनवधानाने बोलले असतील. सत्यजीत तांबे यांना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. आम्ही सत्यजीत तांबे यांच्या तोडीस तोड उमेदवार देऊ. परवा, सोमवारी 16 जानेवारीला ते कळेलच असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्यजीत तांबेंबाबत अगोदरच एका कार्यक्रमात संकेत दिले होते, तेव्हा कॉंग्रेसला जाग आली नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. त्यांना कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हा टोला लगावला होता.