कल्याण : ईडीकडून आज मुंबईतील काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावरही ईडीने धाड टाकली. यासोबतच संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने चौकशी केली. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. याच प्रकरणावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला थेट इशारा दिला.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशामध्ये बदल्याचे राजकारण सुरू आहे. या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर एक सोपे काम आता मोदी सरकारने केलेले आहे. जे काय भ्रष्टाचारी लोक होते. ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या चौकशी सुरू झाल्या त्यांच्यावर दबाव आणून भाजमध्ये दाखल करून घेतले. त्यामुळे अनेक लोक भाजपचे नेते म्हणून एकत्रित आलेले आहेत. उद्या राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले तर या सर्वांना जेलमध्ये टाकायला आम्हाला सोपे होईल, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
पुढे ते म्हणाले की, निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काही आता नवीन नाही. त्याचमुळे विरोधी पक्षातल नेत्यांच्या घरांवर ईडीच्या धाडी टाकण्यात येत आहेत. ही सगळी काही भीती आमच्या लक्षात आहे. त्यामुळे ईडीच्या दबावात विरोधी पक्ष येणार नाही भाजपला सत्तेच्या बाहेर काढणं आज विरोधी पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. देशाला वाचवायचं असेल तर देशाचं संविधान वाचवायचं असेल तर भाजपला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जनताच यांना उत्तर देईल. भाजपला घरी बसवेन आणि काँग्रेसची सत्ता येईल, असे पटोले यावेळी म्हणाले.