राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता नुकताच पाच जागांसाठी शिक्षक आणि पदवीधर निवडणुका पार पडला. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली ती नाशिकची निवडणुक कारण त्याठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला. मात्र, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले. परंतु, यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद निर्माण झाला. सत्यजित तांबेंच्या बाजूकडून बोलत थोरात यांनी हायकमांडकडं पाठविल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे एकच गदारोळ काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे, त्यावरच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले थोरातांचा राजीनाम्यावर अशोक चव्हाण?
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, आम्हाला आताच समजलं. आम्हीसुद्धा पुण्याहून कैलास गोरंटेवारच्या घरी जे लग्न आहे त्यासाठी आलो आहे. येथे आल्यानंतर ही बातमी कानावर आली. बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. यामागचं कारण हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही. बाळासाहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय ते अतिशय संयमी आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागले, असे चव्हाण यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, सकाळी आज मी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती नव्हती. महाराष्ट्राचे प्रभारी हा वाद मिटविण्यासाठी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पक्ष मजबूत होण्यासाठी जे-जे करावं लागेल ते मी आणि विश्वजित कदम आम्ही दोघेही मिळून करू. असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.