सतेज औंधकर | कोल्हापूर : बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांमध्ये संताप वाढत असून शेकडो शिवसैनिकांनी जयसिंगपूर येथील क्रांती चौकातून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे. तर यड्रावकर समर्थनार्थही हजारो कार्यकर्ते एकवटले. यावेळी शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक यांच्यात वाद होऊन राडा झाला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत अस्वस्थ झाल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना जयसिंगपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
एवढी माणसं कशाला मंत्री यड्रावकर यांच्या मातीला, अशा घोषणा देत कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये आज शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. शेकडो शिवसैनिकांनी भर पावसात जोरदार घोषणाबाजी करत जयसिंगपूर येथील क्रांती चौकातून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील यड्रावकर यांच्या ऑफिसकडे येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते. दरम्यान, शिरोळ तालुक्यासह परिसरातील यड्राककर प्रेमी हजारो संख्येने एकवटले आहेत. व यड्रावकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक एकमेकांसमोर आल्याने मोठा राडा झाला. शिवसैनिकांनी यड्रावकर कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. तसेच, यड्रावकर यांचा नामफलकही तोडला. यामुळे जयसिंगपूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला असून पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवलं आहे.
मोर्चादरम्यान पोलिसांच्या धक्काबुक्कीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव अस्वस्थ झाले आहेत. त्यांना तातडीने जयसिंगपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सूरु आहेत. पोलिसांसोबत झालेल्या जोरदार झटापटीत रक्तदाब वाढल्याने मुरलीधर जाधव अस्वस्थ झाल्याचे समजत आहे. रुग्णालायाबाहेर आता शिवसैनिक मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली आहे.