राजकारण

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

भूषण शिंदे | मुंबई: रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” चा वापर करुन खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर ठाणे-नाशिक महामार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आज दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात होत असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष श्री.अनिल गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, वाहतूक उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, पोलीस उपायुक्त एस.व्ही.शिंदे, रस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, एमएमआरडीए मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, अधीक्षक अभियंता रमेश किस्ते, भारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी. एस. साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. ए. तांबे, कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे-नाशिक हे जे अंतर आहे ते पार करण्यासाठी सध्या नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. या मार्गावरील खडड्यांमुळे तसेच येथील अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण, एमएमआरडीए, पोलीस या संबंधित विभागांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहने आहेत त्यांना पार्किंग लॉट मध्ये पार्क केल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात यावी. जेव्हा ट्रॉफिक कमी होईल तेव्हा अवजड वाहने सोडण्यात येतील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रकारे जेएनपीटी येथून येणाऱ्या वाहनांसंबंधी रायगड, ठाणे व पालघर या तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना या वाहनांसंबंधी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ते म्हणाले, समन्वयाने वाहतुकीचे नियमन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम साहित्य टिकत नाही. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड च्या अभियंत्यांनी शोध लावलेल्या “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फायबर आहे. यावरुन अवजड वाहनेसुध्दा जावू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन या महामार्गावरील मोठे मोठे पॅच भरुन काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ठाणे-नाशिक व नाशिक-ठाणे या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम या तंत्रज्ञानानेच करण्यात येणार आहे. ही पध्दत टिकावू आहे. त्यामुळे लोकांना प्रवासात खड्ड्यांचा त्रास होणार नाही.

मुख्यमंत्री महोदयांनी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड चे सुहास मेहता व त्यांच्या टिमचे यावेळी आभार मानले. या कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे संबधितांना निर्देश देवून ते पुढे म्हणाले की, हा लाखो प्रवाशांचा विषय आहे. हा कोणाचा रस्ता आहे, कोण बनवतंय, हे काम कोण करीत आहे, हे महत्त्वाचे नसून सर्वांनी टिम बनून हे काम पूर्ण करायचे आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन लोकांना सुलभ प्रवास करण्यासाठी सहकार्य करायचे आहे. जिंदाल, वाशिंद, आसनगाव रेल्वेपूल या सर्व पूलांवर या पध्दतीचा वापर करणार आहोत. भिवंडी आणि माणकोली मार्गावरील खड्डेही भरण्यात येणार आहेत. भविष्यात खडवली फाटा येथे पूल तयार होणार आहे, त्यामुळे येथील वाहतूक कोंडीदेखील कमी होईल. मनुष्यबळ आणि यांत्रिक सामुग्री यांचा जास्तीत जास्त वापर करुन हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा