नुकताच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालावरून सध्या सगळ्याच पक्षाकडून वेगवेगळे आकडे जाहीर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे विजयी सरपंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहे. आजही काही विजयी सरपंचांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायत निकालाची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्या मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला सरपंच निवडून आणले, हे राज्यातल्या जनतेला कळलं पाहिजे. त्यासाठी काल दीडशे आणि आज 51 आणि उद्या सुद्धा काय उर्वरित सरपंच इथे येतील. सर्व 243 सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निवडून आले आहेत, हा आकडा आणखी वाढणार आहे. या सगळ्या सरपंचांचं मी स्वागत केले आहे.
पुढे बोलताना परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीवर शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही मदत केली आहे. विविध पातळीवर पंचनामे करण्याचा आम्ही सांगितला आहे. त्यानुसार त्यांना मदत मिळेल शेतकऱ्यांना वाऱ्यावर हे सरकार सोडणार नाही. असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यंदाची दिवाळी देखील उत्साहात झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. त्यामध्ये रवा, साखर, तेल, चण्याची डाळ अशी चार वस्तू 100 रुपयांमध्ये देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे.
भास्कर जाधव यांच्या घरावर आज हल्ला झाला त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी मला उत्तर देण्याची गरज नाही. गृह विभाग त्याचे उत्तर देईल, कोणी हल्ला केला काय ते ? असे बोलून त्यांनी उत्तर देण्यास टाळलं.
मुंबईला आज पुन्हा हल्ल्याची धमकी आली त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 26-11 च्या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अपग्रेड केलेली आहे. अशा धमक्या जरी आल्या तरी आमचा गृह विभाग पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यांना करारा जबाब देण्यासाठी. फक्त नागरिकांनी सतर्क राहण्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पोलीस यंत्रणेमध्ये अत्याधुनिक सर्वसामग्री आहेत ते सगळं केलेला आहे.