राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे या गोंधळा दरम्यान राज्यातील एकूण ७ हजार ७८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीच्या जल्लोष संपूर्ण राज्यभरात सध्या होताना दिसत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा आतापर्यंत जिंकल्या आहे. याच निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
भाजप या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवत असून राज्यातील एक नंबरचा पक्ष ठरतोय. तर शिंदे गटालादेखील ठाकरे गटापेक्षा जास्त जागांवर यश मिळाल्याचे दिसत आहे. यावरच मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “युतीला गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी दुप्पट मतांनी विजय झालाय. हा विजय विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आहे. त्याचबरोबर गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये युतीचं काम आहे त्याची पोचपावती देणारा हा निकाल आहे.
आजच्या ग्रामपंचायतीच्या अतिशय घवघवीत आणि दैदीप्यमान विजय युतीला यश मिळालंय. मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.