मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काही ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. या धाडी दरम्यान, अनेक लोकांची चौकशी देखील केली जात आहे. यावरून आरोप- प्रत्यारोप सुरु असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी कथित घोटाळ्याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमका काय केला मुख्यमंत्र्यांना गौप्यस्फोट?
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'ईडीकडून सुरु असलेल्या कथित कोविड घोटाळ्याच्या चौकशीवर मी काही बोलणार नाही, चौकशीत जे काही निघेल ते समोर येईलच. परंतु, सूड भावनेने, आकाशापोटी किंवा राजकीय सूड बुद्धीने कुठलीही कारवाई केली जाणार नाही. यामध्ये परिवाराचा विषयच येत नाही. परिवार कुठून आला? राज्याचे आणि जनतेचे हित बघा.' असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे ते म्हणाले की,'कोविडची आज चौकशी लावलीय तर की कुणी लावली आहे? ईडीने लावली आहे. ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे. या प्रकरणात कॅगचेही ताशेरे आहेत. इकडे माणसं मरत होते. तर दुसरीकडे लोकं पैसे खात होते. मढ्यावरच्या टाळूवरचे लोणी खाणे हे चांगले आहे? मृतदेहांच्या बॅगची किंमत तुम्ही 500 ते 600 रुपयांवरुन थेट 5 हजार ते 6 हजार लावत असाल, यापेक्षा दुसरे मोठे पाप काय असू शकेल? त्यामुळे याचा हिशोब द्यावा लागेल.' असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला.