मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. परमबीर सिंगांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी लाच घेतल्याचा आरोप केला होता. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपवर घणाघात केला आहे. आज परमबीर, आता पुढचे नंबर कोणाचे, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
परमबीर सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द केल्यानंतर क्लाईड क्रास्टो यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. मविआ सरकार बदनाम करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी मदत केली. त्यांना सगळ्यांना वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ करण्याचे उद्योग सुरू झालेत, अशी टीका क्लाईड क्रास्टोंनी भाजपवर केली आहे. आज परमबीर, पुढे नंबर कोणाचा, असा सवालही त्यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
दरम्यान, प्रशासकीय त्रुटींसाठी परमबीर सिंग यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांनी 2022 मध्ये निलंबनाला आव्हान दिले होते. यावर आज शिंदे-फडणवीस सरकारने परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप महाराष्ट्र सरकारने मागे घेतले आहेत. एवढेच नाही तर डिसेंबर २०२१ मध्ये दिलेला निलंबन आदेशही सरकारने रद्द केला आहे. तसेच, निलंबनाच्या काळात ते ऑन ड्युटी होते, असे समजावे, असेही म्हंटले आहे.