अनिल ठाकरे | चंद्रपूर : लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. अशातच, गडचिरोली-चिमूर लोकसभा महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. तसेच, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम उमेदवार असण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही संकेत दिले आहेत.
गडचिरोली लोकसभा निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत गडचिरोली लोकसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाने आपल्या कोट्यात घ्यावी कारण मागील १० वर्षांपासून ही जागा काँग्रेस पक्ष सतत लढत आहे आणि पराभूत होत आहे. काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही. परंतु,धर्मरावबाबा आत्राम हे या जागेसाठी सर्वात सशक्त आणि योग्य उमेदवार आहेत. त्यामुळे या लोकसभेसाठी धर्मरावबाबा आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीची उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी तिन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर केली.
शरद पवार यांनी स्पष्ट संकेत देत गडचिरोली लोकसभेची जागा आपल्याला लढवायची आणि जिंकायची आहे, तुम्ही सर्व तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीला बिघाडी होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.