अमोल धर्माधिकारी | पुणे : पुणे दौरा आणि राजकीय वाद याचे जणू समीकरणच झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पुणे दौरा सुरु होण्याआधीच वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे नगरसेवक नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी एका उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिले आहे. मात्र, या नावाचा महापालिकेत अद्याप मंजूरी दिलेली नाही. अशात या उद्यानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार अशी माहिती समजताच राजकीय वर्तुळातून एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठली.
पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर एक उद्यान उभारण्यात आले आहे. शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं आहे. मात्र, हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केली होती. तसेच, उद्घाटन करत असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारात न घेतल्याचा आरोप भानगिरेंवर केला जात आहे. उदघाटन करण्याआधी पालिकेत प्रस्ताव ठेवला जातो. मात्र, त्याची अद्याप पूर्तता न झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्यान उदघाटना आधीच वादात सापडले आहे.
उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. या प्रमाणे घरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांच्या नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती, असेही त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी या नामकरणाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
दरम्यान, पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचे उदघाटन होणार होते. परंतु, स्वतःच्याच नावाच्या उद्यानाचे उदघाटन शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर या उद्यानाचा उद्घाटन सोहळाच रद्द करण्यात आला आहे. आता एकनाथ शिंदे या उद्यानाला केवळ भेट देणार आहेत. तर, याच परिसरातील उभारण्यात आलेल्या हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उदघाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.