मुंबई : शिंदे सरकाराच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना राजकीय फटकेबाजी केली. तर, आतापर्यंत विरोधकांकडून झालेल्या टीकेवरही जोरदार प्रत्युत्तर दिले. जयंत पाटील राष्ट्रीय प्रवक्तेची जागा घेत आहेत, असे वाटले, असा टोमणा मुख्यमंत्री शिंदेंनी मारला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जयंतराव यांच्याकडे काल काही विषय नव्हता. 50 आमदार यांच्याकडे माझं लक्ष आहे तुमच्या कडचे काही लोकं आहेत. त्यांच्या कडेही माझं लक्ष आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जयंतराव जे ऑपेरेशन करतात त्यात माणसाला दुखत नाही. सगळं काढून घेतात. त्यांनी आम्हाला खूप टोमणे मारले. यावरुन राष्ट्रीय प्रवक्तेची जागा ते घेत आहेत वाटतं, असा मिश्कील टोलाही त्यांनी जयंत पाटलांना लगावला आहे.
तुम्ही नेहमी बोलता मी दिल्लीला जातो. तुम्ही पण जाता ना दिल्लीला. पंतप्रधान यांनी देशाचा डंका जगभर पसरवला आहे. इंदिरा गांधी यांचा मी फॅन होतो. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी आपल्या देशात आणलं. ही महासत्ता आपल्या देशात आहे त्यात तुम्हाला त्रास आहे का? पैशांची कमी होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे, असे त्यांनी सांगितले. तीन वेळा आम्ही तिथे गेलो. ओबीसी विषयांवर आम्ही बैठक केल्या त्यामुळे इथे निर्णय लागला ना. 370 कलम त्यांनी हटवलं, राममंदिर त्यांनी बांधलं. राज्य सरकारच्या हिताचं जे आहे ते केलं पाहिजे.
तुम्ही मला बोलता की इथे या आम्ही मुख्यमंत्री करतो पण विरोधी पक्षनेता तुम्हाला व्हायचं होतं ते दादा झालेत. दादा दादा आहेत त्यांची दादागिरी चालते. जयंतराव तुमचं काम मी कधी केलं नाही? तुम्ही हलकं फुलकं वातावरण करताना आम्हाला बोलताना बोचत होते, असा चिमटाही त्यांनी जयंत पाटलांना काढला.
अमोल मिटकरी आले आणि त्यांनी कळ काढली. रोज गद्दार बोलतात, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस राष्ट्रवादी आमचे शत्रू आहेत. आम्ही युती म्हणून निवडून आलो, संघर्ष केला. लोकांना युतीचं सरकार येईल अशी अपेक्षा होती. अनैसर्गिक आघाडी झाली त्यात बाळासाहेब यांच्या विचारांशी प्रतरणा कोणी केली? भुजबळसाहेब आमचे सिनीयर आहेत. त्यांना आमची भूमिका पटलेली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.