राज्यात राजकीय गदारोळ सुरु असताना अशातच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. यावरच सर्वच पक्षांच्या नेत्यांची या निवडणुकीवर प्रतिक्रिया येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेने 500 पेक्षा जास्त मिळाल्या असा दावा करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी भरभरून मतदान केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेला 500 पेक्षा जास्त सरपंचांच्या जागा विजयी करून दिल्या. त्याबद्द्ल मतदारांना धन्यवाद. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. कारण त्यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
निवडणुकीतील यश, अपयश हे जनतेच्या हातात असते. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी आमच्या बाजूनं कौल दिल आहे. या ग्रामपंचायतीमध्ये चित्र स्पष्ट झाले आहे. ही भूमिका लोकमान्य झाली आहे.बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना या निवडणुकीत चांगले बहुमत मिळाले आहे. लोकांचा भरभरुन प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील प्रथा, परंपरा कायम राखण्याचं काम भाजपनं केलं
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रमेश लटके हा आमचा सहकारी आमदार होता. शरद पवार, राज ठाकरे तसेच प्रताप सरनाईक यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आवाहन केले. राज्याची प्रथा, परंपरा पाहत आलो. त्यानुसार, आमदाराचा मृत्यू झाल्यानंतर घरातलं कुणी उभं राहीले तर बिनविरोध निवड होते. परंतु भाजपाला त्याठिकाणी विजयी होण्याचा देखील विश्वास होता,मात्र सर्वांच्या आवाहनाला भाजपने प्रतिसाद दिला आहे. राज्यातील प्रथा, परंपरा कायम राखण्याचं काम भाजपनं केलं आहे. त्यामुळं उमेदवारी मागे घेतली आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहे.