राज्यात सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र, सत्तास्थापनेच्या वेळेला जे केंद्र बनले होते. त्या आसाममधील गुवाहाटीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा भेट दिली आहे. या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. यावरच आता कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, श्रद्धा आणि मनापासून आम्ही सर्वांनी कामाख्या देवीची पूजा केली. सर्वांना समाधान मिळाले असून सर्वजण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर दिली.
कामाख्या देवीच्या आशिर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नात झालेय. आसाममधील जनतेला आनंद, सुख, समुद्धी मिळाले. तसेच महाराष्ट्राच्या जनतेची सर्व संकटं दूर व्हावीत, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सहकार्य केलेय, त्यांचं आणि स्वागत करणाऱ्या आसामच्या जनतेचे आभार यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, असे बोलताना एकनाथ शिंदे यांनी अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली.