मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशातच कर्नाटकातील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. तर, विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. तसेच, सरकार गप्प का, असा सवाल विचारण्यात येत आहे. यावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक करणाऱ्यांवर बोम्मईंनी कठोर कारवाईचं आश्वासन दिले असल्याचे सांगितले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली. एसटी, गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत दोन्ही राज्यातील जनतेला त्रास होऊ नये, अशी आमची चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशीही याबाबतबत माझी चर्चा झाली. इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतल्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. सौंदर्यकरण, रस्ते, शौचालय, कोळीवाडे प्रश्नांवर चर्चा झाली. युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याचा अॅक्शन प्लॅन तयार केला. शहरात बदल होवून मुलभूत सुविधा देण्यात येणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे.
नेमके प्रकरण काय?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 40 गावांवर दावा दाखवला होता. अशातच, जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या वादाला फोडणी मिळाली आहे. तर, काल मंगळवारी हा वाद तीव्र झाला. कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे. याविरोधात ठिकठिकाणी महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकांच्या बसेसवर काळे फासण्यात येत आहे. विरोधकांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.