नाशिक : अजित पवार आमचेच नेते आहेत, असे विधान करुन शरद पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत. शरद पवार आमचेच आहेत, असे भुजबळांनी म्हंटले आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो. आमचीही तीच भूमिका आहे. अजित पवार आमचे नेते आहेत. दादा जसे नेते तसे आम्ही देखील भुजबळ, मुंडे सुद्धा कार्यकर्ते आहोत. आम्हीही तेच म्हणतोय, म्हणून आम्ही भेटलो. फूट नाही, फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला. तुम्हीही समर्थन द्यावे एवढंच आमचं म्हणणं असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
राजकारणात विकास हा महत्त्वाचा असतोच, पण भावना आणि तत्व देखील महत्त्वाचे असतात. अनेक लोकं ही भावनेने जोडली जातात. त्यासाठी मताचा विरोध मताने करायला हवा. आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमची निशाणी घड्याळच आहे, आमचा झेंडा तोच आहे. काही मंडळी पराचा कावळा करतात, असेही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट होत नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही. असे शरद पवार म्हणाले.