मुंबई : राज्यात राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडत आहेत. यानुसार कोणाकडे किती संख्याबळ आहे याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या कार्यक्रमात 53 आमदारांपैकी 25 आमदारांनी उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमात छगन भुजबळांनी सर्व आरोपांवर भाष्य केले आहे.
अजून बरेच आमदार आमच्याकडे आहेत. या गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू होती. एका दिवसांत घेतलेला हा निर्णय नाही, असं म्हणत भुजबळांनी शरद पवार गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. अजित दादांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला विचारून निर्णय घेतले जात नाहीत, अशी टीका छगन भुजबळांची नाव न घेता सुळे, पाटलांवर केली आहे.
छगन भुजवळ म्हणाले की, आताची ही परिस्थिती पाहून साहेबांना वाईट वाटणं साहजिक आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं, त्यांनाही असंच वाईट वाटलं. बाळासाहेबांनाही मी सोडलं, तेव्हाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडेंही इकडे आले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले.
शरद पवार आमचे विठ्ठल आहेत, पण त्यांना बडव्यांनी घेरलं आहे. साहेब बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला यावा. नागालँडला परमिशन दिली, आम्हालाही द्या. त्यांचा सत्कार केला आम्हालाही सामावून घ्या. आम्ही डिसक्वालिफाय होणार नाही, प्रतिज्ञापत्रावर 40 पेक्षा जास्त आमदारांच्या सह्या आहेत. आम्हालाही कायदे कळतात, सगळी व्यवस्था केली आहे, असेही भुजबळांनी यावेळी म्हंटले आहे.