राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी 'सरस्वती' बाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा राज्यभर होत आहे. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असे विधान भुजबळांनी केले होते. त्यानंतर अनेक स्थरावरून भुजबळांच्या या विधानांचा जोरदार विरोध केला जात आहे. भुजबळ यांनी माफी मागावी अशी काही मागणी संघटनांची मागणी होती. मात्र, त्यावर पुन्हा भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वतीबाबतच्या विधानावर आपण ठाम असून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, असे छगन भुजबळ यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केल आहे.
काय म्हणाले भुजबळ?
येवला येथे बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांनी या देशात समाजक्रांती तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य क्रांती घडवली .ज्या महापुरुषांनी शिक्षणाची कवाडे सर्वांना खुली करून दिली अश्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन शाळेत झालेच पाहिजे आणि हे आमचे मत आम्ही पुढेही ठामपणे मांडत राहू, सरस्वतीबाबतच्या विधानावर आपण ठाम असून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या घरासमोर सरस्वती मातेचा फोटो लावून, दुर्गा मातेची आरती केली. यांना सरस्वती प्रार्थना कशी घ्यायची हे माहीत नाही. मी कुणाच्या भावना दुखत नाही. ज्याला ज्याची पूजा करायची त्याने त्याची पूजा करावी. मला या देशात बोलण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य यावेळी भुजबळ यांनी केलं.