नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असले तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट निशाणा ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून शरद पवारांवर साधला आहे. यावरुन मविआला तडा जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांचे कान टोचले आहेत. राऊतांना असे वाटत का, राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडायला पाहिजे. मनभेद निर्माण व्हावेत, असा प्रश्न भुजबळांनी विचारला आहे.
शरद पवार यांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हणले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तरीही संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे. त्यांना काय अडचण आहे? त्यांना असे वाटत का, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. मनभेद निर्माण व्हावेत, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
तुमचं जेवढ आयुष्य आहे तेवढं शरद पवार साहेबांचं राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. राऊत कुणाच्या घरात गेले होते त्यांनाच माहिती. इतकं लक्ष त्यांनी शिंदे गट आणि त्यांच्या बॅगावर ठेवले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा जोरदार टोलाही भुजबळांनी संजय राऊतांना लगावला आहे.
काय म्हंटले आहे सामना अग्रलेखात?
शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच असले तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट निशाणा सामनातून साधण्यात आला आहे. तर, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. भाजपच्या लॉजिंग-बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे, असेही सामना अग्रलेखात म्हंटले आहे.