राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना आता सत्ताधारी भाजपमध्ये आणि शिवसेनेत आता मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाला केवळ विधानसभेच्या केवळ 48 जागाच मिळणार असल्याचं दिसून येत आहे. त्यावरच आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना सुनावले आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, " त्यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार. अशाप्रकारे बोलल्यामुळे युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त 48 जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा. बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला आहे? अशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असते. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असे विधान केले आहे. त्यांना वाटत आहे की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे. असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे.