नागपूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे, या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. अशात, पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांचे विधानाचं संपूर्ण विपर्यास केला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
पंकजा मुंडे यांचे विधानाचं संपूर्ण विपर्यास केला आहे. मी त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले आहे. पंकजाताईंनी खरंतर भारतीय जनता पक्षाबद्दल आपले मत व्यक्त केला आहे. मी भारतीय पक्षाच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्याच्या बोलण्याचा नेहमी विपर्यास करणे योग्य नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.
वेळ पडल्यास मी ऊस तोडायला जाईल, असेही विधान पंकजा मुंडे यांनी भाषणात केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, पंकजाताई आज महाराष्ट्रात फिरत असून जनसंपर्क अभियानात सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या 15 च्या वर सभा होणार आहेत.
काहीतरी कुठलातरी विषय घेऊन महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण केले जात आहे आणि मी त्यांच्याशी रोज बोलतो आहे देवेंद्रजी बोलतात निश्चितपणे पंकजाताई आमच्या कोर ग्रुपच्या सदस्य आहेत. थोडं जर काही त्या बोलतात त्याचा विपर्यास केले जातो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोन दिवसीय ओबीसी शिबिर घेतले जाणार आहे. त्यावर बावनकुळेंनी निशाणा साधला आहे. सत्येच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ओबीसी करता कुठलेही काम नाही म्हणून ओबीसी मेळावे घेण्याचं काम पडत आहे. देवेंद्र फडणवीस आले तेव्हा ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. राष्ट्रवादीने ओबीसीच्या नावाने नुसता खोटारडापणा केला. सत्तेमध्ये असताना ओबीसीसाठी काही केलं नाही. केवळ ओबीसी समाजाचे मत पाहिजे त्यामुळं या पद्धतीने ओबीसी समाजाचे मेळावे घेण्याचे ढोंग आहे ही नौटंकी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.