सचिन बडे | औरंगाबाद : भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी भाजप व आरएसएस टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या बोलण्यात बदल पाहता असं वाटते की काहीतरी षडयंत्र रचले जाते आहे. बकरा कापण्याच्या आधी त्याला खूप खाऊ पिऊ घातले जाते त्याचाच हा इशारा आहे, असा आरोप आझाद यांनी केला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील काही दिवसांमध्ये मशिदीला भेट दिली होती. तसेच, जातीव्यवस्था संपायला हवी, असे वक्तव्य केले होते. यावर चंद्रशेखर आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मोहन भागवत मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत. मोहन भागवत यांचे वक्तव्यही बदललेले आहेत. भाषाशैलीत बदल झाला असून स्वतः मोहन भागवत म्हणत आहेत की जाती संपवायला हव्यात. स्मशान आणि नळ एक व्हायला हवेत. मला असं वाटते उशिरा का होईना परंतु, जाणीव झाली. ज्यांनी जातीभेद केला आज त्यांच्या बोलण्यात बदल पाहता असं वाटते की काहीतरी षडयंत्र रचले जाते आहे.
बकरा कापण्याच्या आधी त्याला खूप खाऊ पिऊ घातले जाते त्याचाच हा इशारा आहे. त्यांच्याकडे केंद्राचं सरकार आहे. मग, हे का जाती व्यवस्था संपवत नाही, असा सवालदेखील त्यांनी विचारला आहे. मोहन भागवत यांच्यावर जनतेचा दबाव आणि आंदोलने सुरू असल्यामुळे मोहन भागवत आता असे गोड बोलत आहेत, असा निशाणा त्यांनी साधला.
देशभरात पीएफआय संस्थेवर ईडीच्या धाडी पडल्या असून अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याविषयी बोलताना आझाद म्हणाले की, याआधी सुद्धा आरएसएसवर तीन वेळा प्रतिबंध लागलेला आहे. प्रतिबंध लागल्याने कुणी व्यक्ती आणि संघटना अपराधी नाही ठरू शकत. न्यायपालिकेच्या आदेशाचे आम्ही सन्मान करतो, कुणी चुकीचे असेल तर कारवाई व्हायला हवी. मात्र, सत्तेत बसून इमानदार लोकांना जेलमध्ये टाकत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, भाजप हे सुडाच राजकारण करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपसोबतचे सरकार मी आधी पण पाहिले आहे. या सरकारमध्ये आमच्या लोकांवर अन्याय होतो, या अन्यायामुळे आमचे लोक आता उभे राहत आहेत. त्यांच्या खोट्या राष्ट्रवादापासून आणि खोट्या हिंदुत्वापासून सावध राहून आपल्या महापुरुषांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर आझाद यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर दिली आहे.