मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न दिल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. या प्रकारावर राष्ट्रवादी (NCP) चांगलीच आक्रमक झाली होती. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
देहूतील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. पण, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही भाषणाची संधी न दिल्याने हा समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिली होती. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, देहूतील कार्यक्रमावरून वाद निर्माण करण्याची गरज नाही. मी बोलणार नाही असं अजित पवारंच म्हणाले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नका, असेही पाटलांनी म्हंटले आहे.
तर, विधान परिषद निवडणुकीतही भाजपचाच विजय होणार असून यासाठी पूर्वयोजना तयार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
अनिल परब यांच्या शिर्डी दर्शनावरुन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेस चिमटे काढले आहेत. परमेश्वराला न मानणाऱ्या लोकांसोबत असूनही अनिल परब परमेश्वराला मानतात ही आनंदाची गोष्ट आहे, अशा शब्दांत पाटील यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.