मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण व्हावा, असे अजित पवार यांना वाटत असेल, तर ते उशिरा सुचलेलं शहाणपण, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. मोदी सरकारने ३० मे रोजी ८ वर्षे पूर्ण केली. राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी ते बोलत होते.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ७० टक्के भूसंपादन झालेले आहे. त्यानंतर हा प्रकल्प पूर्ण व्हावा, असे अजित पवार यांना वाटत असेल, तर ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आधी बड्या प्रकल्पांना विरोध करायचा. नंतर प्रकल्प पूर्ण होताना दिसू लागल्यास त्याचे फायदे सांगायचे. हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. पण, अजित पवार हे मुख्यमंत्र्यांना समजवण्यात यशस्वी ठरतील असे वाटत नाही, असा निशाणाही चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर साधला.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने सहाव्या जागेसाठी अतिरिक्त उमेदवार उभा केला आहे. यामुळे शिवसेना व भाजप आमने-सामने आले असून दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहे. याबाबतीत बोलताना पाटील म्हणाले, अपक्ष आमदारांना गुप्त मतदानाचा अधिकार आहे. यामुळेच ही निवडणूक अपक्षांच्या जीवावर होईल. त्यामुळे सहाव्या जागेचा फटका कुणाला बसेल हे दोन दिवसांत कळेलच, असा पाटलांनी नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावला आहे.
संभाजी राजेंना भाजपने उमेदवारी का दिली नाही, असा सवाल सातत्याने विरोधकांकडून भाजपला विचारण्यात येत होता. यावर संभाजी राजेंनी उमेदवारी मागितलीच नाही. महाविकास आघाडी आणि शिवसेनेकडे त्यांनी मागितली होती, असे स्पष्टीकरण पाटलांनी दिले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या पंढरपूर वारीत सहभागी होणार आहेत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, १४ जूनला देहूला ट्रस्टींनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. पंढरपूर येथे एक मोठा ध्वज उभारण्याचे काम सुरु असून त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. याबाबतची सर्व तयारीही पूर्ण झालेली आहे. यंदा पंढरपुरात ५० हजार वारकरी येण्याची शक्यता आहे. तसे नियोजन विश्वस्त करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.