मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना संपवायचं काम करत आहेत. विश्वासघातकी लोक आहेत, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. यावेळी खैरे बोलत होते.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. बाळासाहेब यांची ही शिवसेना आहे. आणि उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या नेतृत्वात आपल्याला पुढे जायचं आहे. ही जी विश्वासघातकी लोक आहेत त्यांच्यामुळे काही होणार नाही. आणि येत्या एक तारखेला आई जगदंबाच्या आशीर्वादाने आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह धनुष्याबाणावर दावा केला असून निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण शिवसेनेचं आहे. सहावेळा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवून जिंकलोय. यापुढेही जिंकणार, असा दावा खैरेंनी केला आहे.
एकनाथ शिंदेंबद्दल चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता ते शिवसेना संपवायचं काम करत आहेत. मला त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही, असा आरोप करत प्रतिक्रिया देण्यास टाळले.
दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको. केवळ तुमचे निष्ठापत्र द्या, असं आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आज खूप प्रतिज्ञापत्र आलेली आहेत, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.