सचिन बडे | औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात ईडी का लागत नाही. इतका पैसा कसा आला रिक्षावल्याकडे, असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. बंडखोर खासदारांवरुन (Rebels MP) चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बंडखोरांना ईडीची अथवा केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने होतो. आता खासरदारही फुटल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असून चंद्रकांत खैरेंनी कडाडून टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या विरोधात ईडी का लागत नाही. इतका पैसा रिक्षावल्याकडे कसा आला. आमच्या लोकांना ईडीची भीती दाखवून पळवले. मग एकनाथ शिंदेंच्ईया मागे ईडी का नाही, असा प्रश्न खैरे यांनी उपस्थित केला आहे.
मातोश्रीवर अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची बोलणी झाली होती. तेव्हा मला पण हेलिकॉप्टरने बोलावले होते. पण, नंतर देवेंद्र म्हणाले आम्हीच पाच वर्षे मुख्यमंत्री पदी राहणार, असा खुलासाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच, महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्याच राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा मोठा डाव भाजपचा सुरू आहे, आता ते तेलंगणात सुध्दा घुसत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, आमदारांनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. या खासदारांनी संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा हालचाली सुरु केल्या आहे. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कार्यालय मिळण्याची मागणी केली आहे. या गटात सामील झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची भेट घेत मान्यता मिळावी म्हणून मागणी केली आहे.