केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्यात आलं आहे. एकीकडे नामांतराचे स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र, याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे या नामांतराला विरोध करताना दिसत आहे. जलील यांच्या विरोधामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. यावरूनच आता केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले भागवत कराड?
छत्रपती संभाजीनगर नामांतर निर्णयाविरोधात इम्तियाज जलील हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहे. त्यावरच बोलताना भागवत कराड म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील नामांतराविरोधी सुरू असलेले त्यांचे उपोषण हे चुकीचं असून, खासदार जलील हे नामांतरावरून केवळ आपली राजकीय पोळी भाजत आहेत. असा आरोप त्यांनी केला. शहराचे नाव आता बदललेले आहे. सगळीकडे छत्रपती संभाजीनगर या नावाचा वापर सुरू झाला आहे, आणि इम्तियाज जलील इच्छा असेल की, मरतानाही औरंगाबादमध्ये मरावं वाटल तर त्यांनी बिहार मधील औरंगाबाद येथे जाऊन मरावं लागेल. अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार आमदार संजय शिरसाठ आणि प्रदीप जैस्वाल यांनी औरंगजेबची कबर हैदराबादला हलवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावरूनच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आमदार संजय शिरसाठ आणि प्रदीप जैस्वाल अभिनंदन केले आहे. सोबतच या मागणीचे समर्थन देखील केले आहे.