केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात राज्यात अनेक घडामोडी घडल्या, त्यातच आज त्यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्यावर भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठ थीमपार्क होणार आहे आणि झालं पण पाहिजे. फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील इतिहास प्रेमींसाठी ही महत्वाची जागा आहे, असं अमित शाह म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, हे यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य अमित शाह यांनी उपस्थितांना वाचून दाखवले.
पुढे ते म्हणाले की, आज शिवजयंतीच्याच दिवशी शिसृष्टीचं लोकार्पण होत आहे, हीच सगळ्यात चांगली बाब आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घराघरात पोहचवले. सगळे आयुष्य त्यांनी शिवाजी महारांवर लेखन करण्यात आणि त्याचे विचार रुजवण्यात घालवले. शिवसृष्टीची निर्मिती व जाणता राजा महानाट्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनी देशावर खूप मोठे उपकार केले आहेत. या लोकापर्ण सोहळ्यात मी सहभागी झालो, यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. या शिवसृष्टीला भेट देणारा प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराजांचा संदेश घेऊन त्यांचा विचार घेऊन मार्गस्त होणार आहे. शिवाजी महाराज एक व्यक्ती नव्हते तर ते एक विचार होते. असे अमित शाह यावेळी म्हणाले.