मुंबई : हिवाळी अधिवेशनात दिशा सालियनचे मृत्यूप्रकरण चांगलेच तापले असून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याप्रकरणीचा सीबीआय अहवाल सध्या चर्चेत आहे. परंतु, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियनचा तपास सीबीआयकडे नसल्याचा दावा केला होता. यावर सीबीआयची प्रतिक्रिया आली आहे.
काय होता कथित सीबीआय अहवाल?
8-9 जून 2020 च्या रात्री दिशाने तिच्या फ्लॅटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. तिचे अनेक मित्रही तिथे उपस्थित होते. दिशाने तिच्या बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत भरपूर मद्यपान केले. पार्टी संपल्यानंतर घराच्या बाल्कनीत उभी असता दिशाचा अचानक तोल गेला आणि ती खाली पडली. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने दिशाचा मृत्यू झाला.
या संदर्भात सीबीआयने एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले की, दिशा सालियनशी संबंधित प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही. कारण या प्रकरणाचा तपास कधीही सीबीआयकडे सोपविला गेला नाही. या प्रकरणातील तपास अहवालाबाबत सीबीआयकडे जे काही दावे केले जात आहेत ते चुकीचे आहेत.
दरम्यान, मागील दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी दिशा प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणाकडे पुरावे असतील तर ते एसआयटीला द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.