नवी दिल्ली : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. या कारवाईवरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला.
'पैसे घेऊन प्रश्न' विचारण्याच्या आरोपाबाबतच्या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्याची शिफारस समितीने केली होती. या प्रकरणावर लोकसभेत जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा करण्यात आली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांना बोलण्याची संधी दिली नाही. ते म्हणाले की, मोईत्रा यांनी समितीसमोर आपले म्हणणे मांडले आहे. विरोधी खासदारांनी मोईत्रा यांना बोलू देण्याची मागणी केली. तर, लोकसभेत घाईघाईने चर्चा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ सर्व विरोधी खासदार संसद भवनाबाहेर आले.
संसद सदस्यत्व रद्द करण्याबाबत महुआ मोईत्रा म्हणाले की, मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे मला संसदेच्या सदस्यत्वातून बडतर्फ करण्यात आले आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता, असे त्यांनी म्हंटले आहे.