हिंगोली : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह महिला प्राध्यापक आणि पदाधिकाऱ्यांसह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आता आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, मारहाण करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार संतोष बांगर यांच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील वर्षभरात आमदार संतोष बांगर यांनी अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदारांना मारहाण केली आहे. अशात आता थेट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान प्राचार्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला होता. "त्यांनी एका महिलेवर अत्याचार केला.महिलेची अब्रु चव्हाट्यावर येऊनये म्हणून आम्ही गप्प बसलो. नाहीतर या प्राचार्यांवर आम्ही गुन्हा दाखल केला असता. सरकारमध्ये असलं म्हणून आवाज उठवायचा नाही का? आम्ही काय हातात बांगड्या घातल्या आहेत का?", असं संतोष बांगर यांनी म्हटलं होतं.