मुंबई : ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. आम्ही ग्रीन पॉवर तयार करतोय. कार्बन न्यूट्रल देशाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असेही गडकरींनी म्हंटले आहे. मोदी सरकारच्या नऊ वर्षपुर्तीनिमित्त मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
१९४७ मध्ये स्वतंत्र भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. नेहरु यांनी समाजवाद स्विकारला. ७५ वर्षांत काँग्रेसला ६० वर्षे सत्ता मिळाली. ६० वर्षांत काँग्रेस जे केले नाही ते मोदींच्या नेतृत्वाखाली ९ वर्षांत सरकारने केले. आज समाजवादी पार्टी संपली आहे. त्यांचे खासदार नाहीत, आमदार अपवादात्मक आहेत. त्यांची जनता पार्टी झाली. पार्टीचे तुकडे झाले काही इकडे गेले, काही तिकडे गेले, असा निशाणाही नितीन गडकरींनी समाजवादी पार्टीवर साधला आहे.
दुर्गम व ग्रामीण भागात विकास महत्त्वाचा आहे. रिफॉर्म, परफॉर्म या सुत्रावर विकास होतो. देशात ऊर्जा क्षेत्रात १८ लाख कोटींच्या तोट्यात आहेत. म्हणून ऊर्जा क्षेत्रात बदल करतोय. सौर ऊर्जा वापर वाढवतोय. आम्ही ग्रीन पॉवर तयार करतोय. कार्बन न्यूट्रल देशाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असेही त्यांनी म्हंटले.
मुंबईच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक वर चालल्या तर प्रदूषण प्रचंड कमी होईल. बेस्टने फक्त इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या तरी ३० टक्के फायद्यात येतील. इलेक्ट्रिक कार व स्कूटर येत आहेत. मला पत्रकार विचारत होते की इलेक्ट्रिक कार रस्त्यावर बंद पडली तर चार्ज कशी करणार? आज वेटिंग लिस्ट सुरु आहे. इलेक्ट्रिक मर्सिडीज मी नुकतीच लॉंच केली.
लवकरच ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात आणणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली आहे. चारचाकी व दुचाकी वाहने बाजारात येणारच. पण, आता ट्रॅक्टर, ट्रक सगळी वाहने इथेनॉल वर धावणारी असतील. ऑगस्ट मध्ये टोयोटा गाडी लॉंच करतोय. ही गाडी १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत अवघ्या १५ रुपयांत बायोइथेनॉल लीटर इंधन उपलब्ध होईल. तसेच, ही वाहने प्रदूषण शून्य आहेत, असेही त्यांनी सांगितले. आजच्या ५ वर्षानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात हिंदुस्थान जपानला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला आहे.