कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडे 90 कोटी रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने (एईसी) चार जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव कधी येणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अनेक आमदार नंदनवन (एकनाथ शिंदे यांचा बंगला) आणि सागर (देवेंद्र फडणवीस यांचा बंगला) या ठिकाणी फेऱ्या मारत आहेत. (cabinet minister post cheating 90 crores four arrested)
याचा फायदा घेण्यासाठी चार आरोपींनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. 90 कोटींची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. रियाज शेख (४१, रा. कोल्हापूर), योगेश कुलकर्णी (५७, रा. ठाणे), सागर संगवई (३७) आणि मुंबई येथून अटक करण्यात आलेल्या जफर अहमद रशीद अहमद उस्मानी अशी या आरोपींची नावे आहेत.
मंत्रीपदासाठी ९० कोटींची मागणी
आरोपी रियाज शेख याने 12 जुलै रोजी आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर आरोपी शेखने आमदाराच्या पीएशी संपर्क साधला. आरोपीने सांगितले की आपण दिल्लीहून आलो असून आमदाराला मंत्रीपद मिळवून देण्याबाबत बोलतोय. दुसऱ्या दिवशी पीएचे आमदार कुल यांच्याशी बोलणे झाले, त्यानंतर त्यांनी शेख यांना नरिमन पॉइंट येथील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. आमदार कुल यांनी एका पोर्टफोलिओबद्दल सांगितले, त्यावर आरोपी शेख म्हणाला की यासाठी तुम्हाला 90 कोटी द्यावे लागतील. आमदार पैसे द्यायला तयार झाले, तेव्हा आरोपी शेखने आधी तुम्हाला 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये अॅडव्हान्स द्यावे लागतील, असे सांगितले.
हॉटेलमधून आरोपी पकडला
आमदाराने दुसऱ्या दिवशी ट्रायडंट हॉटेलमध्ये बोलावून अॅडव्हान्स भरण्यास सांगितले. याबाबतची माहिती कुल यांनी पोलिसांना दिल्याने पोलिसांनी सापळा रचला. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपी शेख हॉटेलमध्ये पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आमदार कुल, त्यांचे पीए आणि भाजपचे आणखी एक आमदार हॉटेलमध्ये उपस्थित होते. चौकशीदरम्यान शेखने कुलकर्णी आणि संगवई या आणखी दोन आरोपींच्या भूमिकेची माहिती दिली, त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा दोघांनाही ठाण्यातून अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेने 4 आरोपींना अटक केली
पोलिसांनी नागपाडा परिसरात सापळा रचून मंगळवारी सकाळी उस्मानीला अटक केली. चारही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. याआधीही आरोपींनी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे.