मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी समृध्दी महामार्गाचे लोकार्पण झाले. मात्र, आता लोकार्पणानंतर समृध्दी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. दरम्यान शनिवारी बुलढाण्यात मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. बस पलटल्यानंतर पेटली आणि अपघातात 25 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्थरावरून दु:ख व्यक्त केलं जात आहे. या अपघातावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असताना आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अपघातावरून शिंदे- फडणवीस सरकारला सुनावले आहे.
काय म्हणाले नेमकं उद्धव ठाकरे?
बुलढाणा येथील अपघातावर उद्धव ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, बुलढाणा येथे समृध्दी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आतापर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रध्दांजली अर्पण करतो. असे ते शोक संदेशात म्हंटले आहे.