अभिराज उबाळे | पंढरपूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कंसमामा आहेत. त्यांनी रावणाचं रूप घेतलेय, अशा शब्दात बावनकुळेंचे सख्खे भाचे बीआरएसचे नेते जयकुमार बेलाखडे यांनी टीका केली. बावनकुळे भाजपच्या १०८ माळेतील फक्त एक मणी आहेत. आमच्या मामाला काही कळत नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
बेलाखडे यांनी भाजपची साथ सोडत बीआरएसचा हात पकडला आहे. बेलाखडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. मात्र, त्या मतदारसंघात फडणवीस यांचे स्विय सहाय्यक सुमित वानखेडे विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. आपला मामा पक्षाचा अध्यक्ष असताना तिकीट मिळू शकत नाही हे लक्षात आल्याने बेलाखडे हे बीआरएस पक्षात गेले आहेत. बेलाखडे यांनी नुकतेच त्यांच्या मतदारसंघातील ३ हजार नागरिक यांना घेऊन पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतले.
बेलाखडे यांनी यावेळी शिंदे सरकार वर देखील टीका केली. शिंदे सरकार म्हणजे गारुडी असणारे ५० खोक्क्यांचे सरकार आहेत. त्यामुळे असा सरकारला जनतेने घरी बसवून बीआरएस पक्षाचे शेतकऱ्याचे सरकार राज्यात यावे, असे साकडे बेलाखडे यांनी विठुराया चरणी घातले. बेलाखडे यांच्या या टीकेनंतर राज्यात आगामी काळात मामा-भाचे असा राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे.