राजकारण

भाजपने अंधेरीची निवडणुक लढवू नये; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठींबा देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, चित्रपटात ट्विस्ट यावा तसा राजकारणातही आला आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या भेटी घेतल्या होत्या. यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठींबा देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, चित्रपटात ट्विस्ट यावा तसा राजकारणातही आला आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये, अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काय आहे राज ठाकरे यांचे पत्र?

राज ठाकरे यांनी पत्राच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख प्रिय मित्र असा केला आहे. एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात. तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं थोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तस॑ करावं असे मला माझ मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अशी आशाही राज ठाकरेंनी शेवटी केली आहे.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक ही महापालिकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानण्यात येत होती. या निवडणुकीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) व भाजप-शिंदे गट सामना रंगणार होता. यासाठी जोरदार तयारीही सुरु करण्यात आली होती. परंतु, राज ठाकरे यांच्या पत्राचा मान राखत देवेंद्र फडणवीस उमेदवार मागे घेणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी