शिवसेनेते झालेल्या बंडखोरीपासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामधील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही गटाकडून वार- प्रतिवार सुरू असताना त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका केली आहे. आनंद दिघे यांचे नाव गद्दारांसोबत जोडू नका. हा त्यांचा अपमान आहे, असे विधान राऊतांनी केले आहे. त्यावरच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
शिंदे गटावर केलेल्या राऊतांच्या टीकेवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, 'संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांना कशाप्रकारे त्रास दिला हे सर्व शिवसैनिकांना माहित आहे. दिघेंबाबत आज राऊत चांगले बोलत आहेत. याच राऊतांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब दिघेंचा कसा द्वेष करायचे हे जुन्या शिवसैनिकांना विचारा. ज्या दिवशी दिघे यांच्या मृत्यूची कथा लिहिली जाईल, तेव्हा उद्धव ठाकरेंचा रोल हा व्हिलनचा असेल,' असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, 2019 ला स्वतःच्या आमदारकीसाठी आणि मेहुण्याला वाचवण्यासाठी उद्धवजी कितीवेळा दिल्लीला गेले, किती वेळा मोदींसमोर झुकले. हे महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा तुम्हाला मोदी हुकूमशहा वाटले नाहीत? असा सवाल त्यांनी केला. दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर श्रद्धा असलेले शिवसैनिक होते.गद्दारांच्या तोंडी त्याचं नाव येणे म्हणजे त्या दिघेसाहेबांच्या निष्ठेचा अपमान आहे. त्यामुळे गद्दारांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी टीका त्यांनी केली.