राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरून जुंपलेली असताना त्यातच शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यावरच बोलताना संजय राऊत यांनी राजकारणात खळबळ माजवून देणारे विधान केले होते. त्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर?
संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना भातखळकर म्हणाले की, संजय राऊत यांना “कटुता संपायला हवी” या देवेंद्रजींच्या वक्तव्याची आठवण झाली आहे. भाजपाला कटुता निर्माण करण्यात कधीही रस नव्हता. परंतु संजय राऊत ही कटुता संपुष्टात येणारच नाही असा पण करून बसलेत त्याचे काय? तुम्ही तोंडात बोळा कोंबल्याशिवाय काहीच शक्य नाही हो. अशी त्यांनी यावेळी राऊत यांच्यावर केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपुर्वी म्हणाले होते. त्यावेळी मी त्या वक्तव्याचे स्वागत केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी टोकाची कटुता, द्वेष, सुडाचे राजकारण हे मागच्या ६०-६५ वर्षात कधीही पाहिले गेले नाही. राजकीय मतभेत हे होतच असतात. पण ज्यापद्धतीचे राजकारण महाराष्ट्रत होत आहे, ही आपली परंपरा नाही. सत्तांतरे होत असताना इतक्या टोकाची कटुता कधी पाहिली नाही. फडणवीस कटूता संपविण्याचे नेतृत्व करत असतील तर महाराष्ट्र नक्कीच त्यांचे स्वागत करेल. महाराष्ट्राच्या राजकारणात जी विषाची उकळी फुटली आहे, ती संपुष्टात आली पाहीजे. असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.