राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र प्रचंड नुकसान केले आहे. राज्यसरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. अनेक मंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावरच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
काय म्हणाले भातखळकर?
अतुल भातखळकर ट्विटकरत उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मविआच्या काळात न फुटलेले, घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके,ॲपटीबार…घरटीबॅाम्ब…सुरसुरी…उद्धव ठाकरेंचा असा उल्लेख करत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, ऐन दिवाळीत सरकारकडं तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसला, तरी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे.धीर सोडू नका. तर आत्महत्येचा विचार मनात आणू नका. उत्सव साजरे करताना प्रजेकडे पाहणं हे राज्य सरकारचे काम असते. सरकार घोषणांची अतिवृष्टी करत आहे. मात्र, राज्य सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. अशी जोरदार टीका त्यांनी राज्य सरकारवर केली होती.