सातारा : राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिकाच सुरु आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा वाद अजून शमला नसतानाच आज शिवप्रताप दिनीच भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. यामुळे आता राज्यात नव्या वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?
शिवप्रताप दिनी आज प्रतापगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते. पण, ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवले होते. पण, महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असे त्यांनी म्हंटले आहे. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरूनआता राजकीय वर्तुळात त्यांच्या पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श तर आजच्या काळातले शरद पवार आणि नितीन गडकरी हे आदर्श आहेत. राज्यपालांच्या राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. राज्यभरातून राज्यपालांविरोधात निदर्शने करण्यात येत असून विरोधकांकडून महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे. तसेच, राज्यपाल पदावरुन कोश्यारींना हटविण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.