राज्यात सध्या प्रचंड राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच राणे विरुद्ध भास्कर जाधव असा वाद वाढतच चालला आहे. उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीच्या निषेधार्थ कुडाळ येथे ठाकरे गटाकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर खोचक टीका केली होती. या रॅलीला उत्तर देत भाजपने संविधान रॅलीचे आयोजीत केली होती. या रॅलीत भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड?
भास्कर जाधवांच्या टीकेवर उत्तर देतांना लाड म्हणाले की, “संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही ज्यांनी आणीबाणी रॅली काढली त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. कसली आणीबाणी रॅली काढता. तुम्ही चिंधीचोर आहात. तुमच्यावर चोरीचे गुन्हे आहेत. आपण त्यांचे नावही घ्यायला नको. आपण वैभव नाईक यांचे नाव चिंधीचोर ठेवु. तर भास्कर जाधव यांचे नाव आयटम गर्ल ठेवु. मी भास्कर जाधव यांचे भाषण ऐकले. ते खूप नाटक करतात. चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर योग्य टीका केली आहे. या लोकांची नावे घेऊन आपण त्यांना मोठे करायचं नाही,” अशी घणाघाती टीका प्रसाद लाड यांनी केली.
१० वर्षांत संपत्ती ३०० पटीने वाढू शकते का?
“उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केले. तेव्हा नारायण राणे भाजपासोबत असते तर निलेश राणे आज खासदार असते. वैभव नाईक यांच्याविरोधात तक्रार करणारे आम्ही नव्हतो. गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे. वैभव नाईक हे लोकांच्या पैशावर मोठे झाले आहेत. १० वर्षांत संपत्ती ३०० पटीने वाढू शकते का? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे,” अशा शब्दात लाड यांनी उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईकांवर निशाणा साधला आहे.