मुंडे आणि महाजन या दोन्ही परिवारांनी आपले आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी खर्ची केले आहे. परंतु तरीही त्यांना डावलण्यात येत आहे. आज कोणीही नवखे आले की त्यांच्यासाठी पक्ष उमेदवारी देतो. पंकजा मुंडे (pankaja Munde) यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे, असे पुर्वाश्रमीचे भाजप नेते व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे (eknathkhadse)यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यासाठी खडसे मुंबईत आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी माध्यमांशी बोलतांना खडसे म्हणाले की, मुंडे-महाजन यांनी पक्षातील अनेक नेत्यांना मोठे केले. मात्र, त्यांच्या कुटुंबियांना आज जी वागणूक मिळत आहे ती दुर्देवी आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते फार अनुभवी आहेत आणि कदाचित म्हणून त्यांनी त्यानुसार निर्णय घेतला असेल, असे फडणवीस यांचे नाव न घेता खडसे यांनी सांगितले.
विधानपरिषद घोडेबाजार
राज्यसभा व आणि विधानसभा बिनविरोध होत नाही, त्यावर बोलतांना खडसे म्हणाले की, आधीच्या काळी समन्वयाने आणि सम उपचाराने उमेदवारी देऊन हे प्रश्न निकाली लावले जायचे मात्र आता जाणून बुजून घोडेबाजाराला प्राधान्य देऊन जे राजकारण केले जात आहे अतिशय दुर्दैवी आहे.
आता राष्ट्रवादीला मोठे करेल
मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे. आधी भारतीय जनता पार्टी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा माझा प्रवास झाला. माझे राजकीय जीवन अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी मला जो आधार दिला , माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे... माझे अर्धे आयुष्य हे भाजपला मोठे करण्यात गेले आणि आता पुढचे आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे करण्यात जाईल...