राज्यात सध्या एकच राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. हे सर्व सुरु असताना भाजपचे नेते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अवमानकार विधान केले होते. त्यानंतर राज्यात एकच राजकारण तापले होते. त्याच विधानामुळे काल पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
एखाद्या राजकीय नेत्याने केलेल्या विधानबद्दल कुणाला वाईट वाटले असेल, त्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील आणि त्याबद्दल त्या व्यक्तीने माफी मागितली असेल तर त्याला माफ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या वयस्कर व्यक्तीवर अशा प्रकारे शाईफेकणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. नेत्यांनी महामानवांबद्दल बोलूच नये असे मला वाटते. पण एखाद्यावेळी चूकन झालेल्या विधानावर माफी मागितल्यानंतर माफ केले पाहिजे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर 307 चा गुन्हा
काल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. त्या शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. परंतु, मनोज गरबडेवर दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्याता वर्तवली जात आहे.