लोकसभा निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने बीडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी धामणगाव येथे जनतेशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी महत्वाचं विधान करत मराठा आंदोलकांना आश्वसनही दिलं. माझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा शब्द दिला होता, तो मी पूर्ण करणार, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाबद्दल मोठं विधान केलं.
एक दिवस अचानक गोपीनाथ मुंडे यांनी मला सांगितले की तुला विधानसभा लढवायची आहे, तेव्हापासून मी राजकारणात सक्रिय झाले. मी पराक्रमी आहे, मी एका निर्णयात या जिल्हयातील ऊसतोड मजुरांना मजुरी वाढवून देऊ शकते. आज सकाळपासून मी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. पंकजा ताई ना कोण धक्का देणारं, कोण उभा राहणार अशा बातम्या सुरू आहेत. पण उमेदवार पक्षाचा असतो. मला लोकसभा लढवायची नव्हती, मला राज्यात काम करायचे होते. मी बुध्दीने निर्णय घेणार आहे. माझं मन कपाटात काढून ठेवणार नाही. माझं मन सुद्धा त्यामध्ये सहभागी असणार आहे. या मंचावर विराजमान एक एक माणूस नेता आहे. मी आमदार आणि खासदार व्हायची माझी ताकद नाही पण खरी ताकद तुमची आहे. हात जोडून विनंती करते की तुम्ही मला आशीर्वाद द्या, माझ्या जातीवर बोट ठेवले जाते, हे वाईट वाटते, मला मतदान न दिलेल्या गावातही मी निधी दिला. मराठा बांधवांचा आक्रोश योग्य आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा मराठा आरक्षणाचा शब्द दिला होता, कदाचित तो माझ्या हातून पूर्ण होणार असेल. मी कोणत्याही जाती पतीच्या मंचावर गेलो होतो, सर्व रंग एकत्र करायचे आहे, मी चांगले काम करण्याचे वचन देते. कोणता माणूस कोणत्या कारणाने मत मागतो हेही मतदार पाहतील. आपण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आदर करतो, गोपीनाथ मुंडे यांची शपथ घेऊन सांगते मी कोणत्याही समाजाचे नुकसान होऊ देणार नाही कोणत्या गावात अडवले तर शांत रहा, सवांद करा, आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या.