लक्ष्मीकांत घोणसेपाटील | रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना प्रशासन जर जबरदस्तीने टोल सुरू करत असेल तर पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा भाजप नेते निलेश राणे यांनी प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाने आधी जनतेचे प्रश्न, म्हणणे जाणून घ्यावे, ते सोडवावेत आणि मगच टोल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचनाही निलेश राणे यांनी केली आहे.
या सर्व प्रकाराबाबत निलेश राणे यांनी ट्विट देखील केले आहे. ते म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोल नाका येथे म्हणजेच अगदी टोलच्या आजूबाजूला देखील काम पूर्ण झालेले नाही. रायगड जिल्ह्यात देखील काम अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकणाचे काम केवळ 60 टक्केच झाले आहे. त्यामुळे काम अपूर्ण असताना टोल सुरू करणे ही जनतेवर जबरदस्ती आहे.
जनतेने एकदा याबाबत निवेदनही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या प्रशासनाने ऐकून घ्यायला हव्यात. टोलला आमचा विरोध नाही मात्र काम अपूर्ण असताना, जनतेचे प्रश्न न सोडवता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता जर जबरदस्तीने अचानक टोल सुरू करू नये. भविष्यात जनता रस्त्यावर उतरली तर याला कोण जबाबदार, असा प्रश्न देखील निलेश राणे यांनी केला आहे. जनतेच्या मागण्या ऐकून घेऊन मग टोलबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले आहे.