राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान, आज भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले सोमय्या?
49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यात का आले? याच उत्तर द्या. रजत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अस्तित्वात नसताना हे पैसे आले. बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात हे कोल्हापूरकरांना कळू द्या. हे पैसे कसे आले हे कळलं तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील. ग्रामविकास मंत्री असताना जावयासाठी ग्रामपंचायतींना झिझिया कर लावला गेला. मुश्रीफ कोणाला मूर्ख बनवत आहेत? कंत्राट रद्द केलं म्हणतात. पण आधी दिलं तर होत ना? मी प्रकरण बाहेर काढल्यानंतर कंत्राट रद्द केलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला तसे वचन दिलं आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, हसन मुश्रीफ यांनी जो भ्रष्टाचार केला त्याच्या पै आणि पैचा हिशोब किरीट सोमय्या जनतेला देणार आहे. माउंट कपिटल, आणि रजत कंझ्युमर या बंद कंपन्यातून पैसे कसे आले. भावना गवळी, प्रताप सरनाईक यांनी तुमच्या आशीर्वादाने घोटाळा केला असेल. तुम्ही आता त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची माहिती द्या, मी वाट पाहतोय. विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर मुश्रीफ यांनी केलेलं विधान मला मान्य आहे असं सांगावं. हिरवा झेंडा घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी हे विधान मान्य आहे असं सांगावं. घोटाळे केले त्यावेळी धर्म आठवला नाही का? असा सवाल सोमय्या यांनी केला.